उडान च्या यशस्वी हस्तक्षेपामुळे जामखेड येथे बालविवाह रोखला
मुलीच्या शिक्षणाला कायद्याचे बळ-योगेश अब्दुले
जामखेड येथे नियोजित असलेला बालविवाह ‘स्नेहालय उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान,जामखेड पोलीस, जिल्हा महिला व बालविकास विभाग, चाईल्ड लाईन यांनी वेळेवर केलेल्या प्रभावी हस्तक्षेपामुळे यशस्वीरित्या थांबवण्यात आला आहे.
या घटनेमुळे एका अल्पवयीन मुलीचे भविष्य सुरक्षित झाले असून तिला कायद्याचे संरक्षण आणि पुढील शिक्षणाला बळ मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जामखेड शहरातील एका कुटुंबाने त्यांच्या मुलीचा विवाह निश्चित केला होता.या संभाव्य बालविवाहाची माहिती ‘उडान’ आणि चाईल्ड लाईन हेल्पलाईनवर आलेल्या एका गोपनीय फोनद्वारे समन्वयक योगेश अब्दुले यांना मिळाली.
माहिती मिळताच बालहक्क कार्यकर्ते योगेश अब्दुले यांनी हा बालविवाह थांबविण्यासाठी अत्यंत कार्यतत्परता दाखवत उरण प्रकल्प जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची दखल घेतली अन तातडीने सूत्रे हलवली.
बालविवाह कायद्यातील तरतुदी आणि ‘उडान’चा सहाय्यक हस्तक्षेप उडान टीमने सर्वप्रथम पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी,एस.डी. लोखंडे,शिवाजी कदम यांच्याशी संपर्क साधून माहितीची पडताळणी करत खात्री केली.त्यानंतर बालहक्क कार्यकर्ते योगेश अब्दुले, पोलीस हेड कॉन्स्टेबल एस.डी.लोखंडे, शिवाजी कदम,कुलदीप घोळवे, बाबासाहेब कडभने, सुशांत राळेभात,अंगणवाडी सेविका सुरेखा सदाफुले यांनी मुलीच्या व मुलाच्या पालकांशी थेट संवाद साधून त्यांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील तरतुदींची माहिती दिली.
या कायद्यानुसार मुलीसाठी विवाहाचे कायदेशीर वय १८ वर्षे आणि मुलासाठी २१ वर्षे असणे बंधनकारक आहे.हे अधिकारी व उडान’च्या कार्यकर्त्यांनी पालकांना समजावून सांगितले. बालविवाह घडवून आणल्यास दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात असेही स्पष्ट करण्यात आले.
आरोग्यावर आणि मानसिक दुष्परिणामांवर समुपदेशन
‘उडान’च्या कार्यकर्त्यांनी पालकांना केवळ कायद्याची माहिती दिली नाही तर बालविवाहाचे मुलीच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर होणारे गंभीर दुष्परिणाम देखील समजावून सांगितले. अल्पवयीन वयात होणाऱ्या गर्भधारणा आणि प्रसूतीमुळे शारीरिक गुंतागुंत, कुपोषण आणि बालमृत्यू, मातामृत्यू,विविध गंभीर आजारांचा धोका वाढतो हे त्यांनी स्पष्ट करत समुपदेशन केले.यासोबतच बालविवाहामुळे मुलींचे बालपण हिरावले जाते.त्यांच्यावर मानसिक ताण येतो,आत्मविश्वास कमी होतो आणि शैक्षणिक संधींची दारे बंद होतात.ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
अधिकाऱ्यांच्या भूमिका आणि स्थानिक प्रशासनाचे सहकार्य या घटनेच्या यशस्वी हस्तक्षेपानंतर विविध अधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. • ‘उडान’ बालविवाह प्रतिबंधक प्रकल्पाचे बालहक्क कार्यकर्ते योगेश अब्दुले म्हणाले की;बालविवाह रोखणे हे केवळ सामाजिक अन कायदेशीर कर्तव्य नाही तर मुलीचे भविष्य सुरक्षित आणि सक्षम करण्याची गरज आहे.मुलीचे शिक्षण पुढे चालू राहण्यासाठी आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करू ‘उडान’ प्रकल्प या मुलीला शिक्षण,आत्मनिर्भर करण्यासाठी कटिबद्ध आहे.
• पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी,शिवाजी कदम,एस.डी. लोखंडे यांनी कायद्याच्या अंमलबजावणीवर जोर दिला.ते म्हणाले;बालविवाह हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे.माहिती मिळताच आम्ही तातडीने हस्तक्षेप केला.प्रशासन बालविवाहासारख्या दुष्कृत्यांना कोणताही थारा देणार नाही.अल्पवयीन मुला-मुलींच्या संरक्षणासाठी कठोर पाऊले उचलेल.
• उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात म्हणाले की;बालविवाह कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.ग्रामस्थ आणि पालकांनी कायद्याचे पालन करावे.
मुलीचे शिक्षण आणि स्वावलंबी भविष्य ‘उडान’ प्रकल्प केवळ बालविवाह रोखण्यापुरते मर्यादित नाही; ते जनजागृती,शिक्षण,पुनर्वसन,आरोग्य आणि स्वावलंबनांवर कार्य करते.बालविवाह थांबल्यानंतर ‘उडान’ प्रकल्प मुलीचे शिक्षण पुढे चालू राहण्यासाठी तिला पुन्हा शाळेत दाखल करून सक्षम आणि स्वावलंबी भविष्यासाठी प्रयत्नशील असेल.स्नेहालय ‘उडान’ प्रकल्पाचे आणि चाईल्ड लाईनचे हे कार्य बालविवाह मुक्त भारताची प्रेरणा बनत आहे.यामुळे अनेक मुलींचे आयुष्य सुरक्षित बनत आहेत.