Wednesday, May 6, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड येथे पारधी कुटुंबावरील अत्याचारप्रकरणी विवेक विचार मंचची कठोर कारवाईची मागणी

जामखेड येथे पारधी कुटुंबावरील अत्याचारप्रकरणी विवेक विचार मंचची कठोर कारवाईची मागणी

0
2

जामखेड न्युज – – – – – – – – 

जामखेड येथे पारधी कुटुंबावरील अत्याचारप्रकरणी विवेक विचार मंचची कठोर कारवाईची मागणी

 

जामखेड येथील अनुसूचित जमातीतील पारधी समाजाच्या कुटुंबावर जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण, निवासी पत्र्याच्या शेडची मोडतोड तसेच जागा बळकावण्याच्या प्रयत्नाच्या घटनेचा तीव्र निषेध करत संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी विवेक विचार मंच महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आली.

या प्रकरणी विवेक विचार मंच महाराष्ट्राचे विभाग संयोजक ॲड. प्रबोधन निकाळजे यांनी पीडित पारधी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) प्रवीण लोखंडे तसेच पोलीस निरीक्षक चौधरी यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जामखेड येथे मागील दहा-बारा वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या पारधी जमातीच्या कुटुंबाच्या न्यायप्रविष्ट जागेवरील पत्र्याच्या शेडची काही जातीवादी समाजकंटकांनी मोडतोड केली. संबंधित कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली तसेच जागा बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रकरणी फिर्यादी लता रामदास शिंदे (वय ५०, व्यवसाय – मजुरी, रा. बस स्टँडसमोर, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत त्यांनी नमूद केले आहे की, दिनांक ०२/०५/२०२६ रोजी दुपारी २.०० वाजण्याच्या सुमारास त्या घरासमोर नगरपरिषदेचे पिण्याचे पाणी भरत असताना आरोपींनी घरात घुसून मोडतोड, शिवीगाळ व मारहाण केली.

या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अकरा जणांविरुद्ध विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये वसीम महेबूब शेख, साद शाहादुल शेख (दोघे रा. कोंढवा, पुणे), आयमा अब्दुल शेख (रा. मार्केट यार्ड, पुणे), स्नेहा नितीन कांबळे (रा. हडपसर, पुणे), फरीन नाशीर खान (रा. बिबेवाडी, कोंढवा, पुणे) यांच्यासह अन्य आरोपींचा समावेश आहे.

परंतु पीडित कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्यांची संख्या साधारणतः ९० ते १०० इतकी होती. हे आरोपी ४ क्रूझर गाड्या व एका ट्रॅव्हलर वाहनातून आले होते. त्यामध्ये ५० ते ६० पुरुष गुंड तसेच ४० ते ४५ महिला गुंडांचा समावेश होता. जामखेड येथील स्थानिक लोकांनीच हा हल्ला घडवून आणला असल्याची देखील माहिती मिळाली. या घटनेमुळे आदिवासी, वंचित व गरीब समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिनिधी मंडळाने सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, पीडित कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, न्यायप्रविष्ट जागेवरील बेकायदेशीर हस्तक्षेप थांबवावा तसेच आरोपींना अटकपूर्व किंवा नियमित जामीन मिळू नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे.

तसेच फिर्यादीचा पुरवणी जबाब तात्काळ नोंदविण्यात यावा, घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेऊन तपास करण्यात यावा, जेणेकरून सर्व आरोपींची ओळख पटून निष्पक्ष तपास होऊ शकेल, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी जामखेड परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना कराव्यात तसेच संविधानाने दिलेल्या समानता, न्याय आणि सुरक्षिततेच्या मूल्यांचे रक्षण करावे, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी इंजी. वैभव कार्ले, सामाजिक समरसता मंच तालुका प्रमुख दत्तात्रय पवार, योगेश औचारे, किरण जगताप व अमोल धोत्रे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!