अतिक्रमणाबाबत अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी, नेमका न्याय कोणाकडे मागायचा? अवधूत पवार यांचे उपोषण सुरु
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी. लगतच्या अतिक्रमण व अनियमिततेबाबत कारवाई न झाल्याने आजपासून सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार हे आमरण उपोषणाला बसले आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अधिकारी एस. बी चेमटे म्हणाले की, आमचा काही संबंध नाही. नगरपरिषदेने अतिक्रमण काढावेत तर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणाले की आमची सर्व तयारी आहे पण राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार सहकार्य करत नाहीत. यामुळे जामखेड शहराचा विकास खुंटला आहे. अतिक्रमण नेमके कोणी काढावयाचे हाच प्रश्न निर्माण झाला आहे.
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी. लगतच्या अतिक्रमण व अनियमिततेबाबतआज सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शहाजी राळेभात, माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकर, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, मनसे नेते प्रदीप टापरे,राजेंद्र पवार, मंगेश आजबे, युवक काँग्रेसचे राहुल उगले, काकासाहेब गर्जे,नगरसेवक राजेंद्र गोरे, प्रशांत राळेभात, वसिम सय्यद,पवन राळेभात, कुंडल राळेभात, संदीप राळेभात, अकबर सय्यद,संतोष गव्हाळे, युवा नेते अमोल गिरमे, त्रिंबक कुमटकर,राजेंद्र सदाफुले, मनोज पूंज,रंगनाथ राळेभात,मनोज भोरे,संभाजी मुळे, सामाजिक कार्यकर्ते सुनील जगताप, गणेश हगवणे,बाबा चंदन,अनिल सदाफुले,नय्यूम सुभेदार, ॲड.महारुद्र नागरगोजे,नितीन राजपूरे, ऋषिकेश डूचे,घनश्याम राळेभात,डाॅ.प्रणव राळेभात,दिपक घायतडक, स्वामी दिक्षित, उमेश राळेभात, सोहेल काझी,शहबाज सय्यद, दत्तात्रय डिसले, गणेश वारे, विशाल ढवळे तसेच सुरेखा सदाफुले,शैला सदाफुले आदींनी या उपोषणाला पाठिंबा दिला.
यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या भुमीकेकडे लक्ष लागले आहे. यावेळी अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांनी अवधूत पवार यांना पाठिंबा दिला आहे.जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८-डी.लगतच्या अतिक्रमण व विविध अनियमिततेबाबत प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने आज दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ पासून जामखेड तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार आमरण उपोषणाला बसले आहेत.
याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना सादर करण्यात आले आहे.यापूर्वी दिनांक ९/०२/२०२६ रोजी मा. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांना सविस्तर निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये १५ दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही न झाल्यास लोकशाही व संविधानिक मार्गाने उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आजपर्यंत प्रत्यक्ष आणि परिणामकारक कारवाई न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.जामखेड शहर हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-डी लगतची पक्की अतिक्रमण, रस्त्याच्या कामातील अनियमितता, निकृष्ट दर्जा, जियो-टॅगिंगमधील संभाव्य फेरफार तसेच महावितरणच्या विद्युत खांबांमुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीबाबत निवेदन देण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या ————————- १. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-डी. लगतच्या जामखेड शहर हद्दीतील सर्व अतिक्रमणांवर नियमानुसार व निष्पक्ष कारवाई करावी. २. रस्त्याच्या कामाबाबत स्वतंत्र तांत्रिक चौकशी समिती नेमावी. ३. डीपीआर, जियो-टॅगिंग नोंदी व प्रत्यक्ष मोजणीची सखोल पडताळणी करून दोषींवर कारवाई करावी. ४. महावितरणच्या विद्युत खांबांबाबत तातडीने सुरक्षिततेची उपाययोजना करावी. ५. वाहतूक कोंडीची समस्या तात्काळ मार्गी लावावी.
राष्ट्रीय महामार्गाचा हा प्रश्न केवळ विकासापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सुरक्षितता, वाहतूक सुरळीतता आणि प्रशासनाच्या निष्पक्षतेशी संबंधित असल्याचे पवार यांनी नमूद केले. नेहमी हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांची अतिक्रमणे हटवून पक्की बांधकामे कायम ठेवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशाराही सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी दिला आहे.
चौकट
नेमका न्याय कोणाकडे मागायचा – अवधूत पवार
आज उपोषण स्थळी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी भेट दिली तेव्हा त्यांनी महामार्गाचे अधिकारी चेमटे यांना फोन केला तर चेमटे म्हणाले आमचा काहीही संबंध नाही नगरपरिषदेने अतिक्रमण काढावेत तर नगरपरिषद म्हणते आम्ही सहकार्य करायला तयार आहेत पण महामार्गाचे अधिकारी सहकार्य करत नाहीत. त्यामुळे नेमके अतिक्रमणाबाबत कोणाची जबाबदारी आहे. अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत. आम्ही नेमका न्याय कोणाकडे मागायचा असाच संतप्त सवाल उपोषण कर्ते अवधूत पवार यांनी उपस्थित केला.