Tuesday, February 10, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे व निकृष्ट काम अवधुत पवार यांनी...

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे व निकृष्ट काम अवधुत पवार यांनी केली जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी

0
10

जामखेड न्युज—–

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे व निकृष्ट काम

अवधुत पवार यांनी केली जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी

       

राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-D अंतर्गत जामखेड शहर हद्दीत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील अनियमितता, निकृष्ट दर्जा तसेच महामार्गालगत झालेल्या अतिक्रमणांबाबत चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अवधुत पवार यांनी निवासी जिल्हाधिकारी मा. दादासाहेब गीते यांना आज सादर केले.

जामखेड शहर हे आजूबाजूच्या सहा-सात तालुक्यांसाठी महत्त्वाची बाजारपेठ असून शेतीमाल खरेदी-विक्री, व्यापार व दैनंदिन व्यवहारांसाठी प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते.

       

भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थानामुळे जामखेड शहराला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून संबोधले जाते. या शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-D हा वाहतूक व व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून परिसरातील तालुके व मराठवाडा विभागाशी संपर्क मजबूत करतो.

सदर महामार्ग अंतर्गत जामखेड – सौताडा रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी निश्चित असताना देखील गेल्या तीन ते चार वर्षांपासून काम प्रलंबित असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जामखेड शहरात महामार्गालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून इतर ठिकाणी कारवाई करण्यात आलेली असताना जामखेड शहरात प्रभावी कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

तसेच रस्त्याच्या कामातील निकृष्ट दर्जा, रस्त्याची असमान रुंदी, जियो-टॅगिंग प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या शंका, गटारांच्या कामातील त्रुटी तसेच बीड रोड परिसरात महावितरणचे विद्युत खांब न हलवता काम करण्यात आल्याने वाहतुकीचा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याची बाबही निवेदनात मांडण्यात आली आहे.

या सर्व प्रकरणाची तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अतिक्रमणे हटवावीत तसेच वाहतूक कोंडीची समस्या तात्काळ सोडवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्यांवर १५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास जामखेड तहसील कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!