जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामाबद्दल जामखेडकर हतबल
मुजोर ठेकेदार कोणाचेच ऐकत नाही, अतिक्रमणे निघत नाहीत त्याला अभय कोणाचे
अठरा महिन्यात काम पुर्ण करण्याच्या हमीवर काम घेणाऱ्या ठेकेदाराने तीन वर्षे झाले तरी अद्याप काम अर्धवट ठेवले आहे. नेमके शहरातील खर्डा चौक ते समर्थ हाँस्पीटल काम बाकी आहे. वीस दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी अधिकारी व प्रोजेक्ट मॅनेजर यांची बैठक घेत ताबडतोब काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या काम अडविणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे सांगितले होते या घटनेनंतर आता वीस दिवस झाले आहेत तरीही अद्याप कसलीही हालचाल नाही. यामुळे ठेकेदापुढे सगळेच हतबल झाले आहेत. ठेकेदाराला नेमके अभय कोणाचे आहे याचीच चर्चा जामखेड शहरात आहे. जिल्हाधिकारी यांचे ठेकेदार ऐकत नाही, नुतन नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनीही आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांना रस्ता बाबत निवेदन दिले होते. तरीही रस्ता सुरू होत नाही.
अर्धवट व अपुर्ण कामामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गाड्या घसरून अनेकांना अपंगत्व आले आहे. पाणी मारले की गाड्या घसरतात नाही मारले तर धुळीचा त्रास, तसेच रस्ता कडेला लावलेले अस्ताव्यस्त वाहने यामुळे रहदारी ची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा त्रास जामखेड कर सहन करत आहेत.
जामखेड शेजारी आष्टी, पाटोदा, तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अतिक्रमणे हटवून सुसज्ज रस्ते झाले आहेत मात्र जामखेड मधील काही अतिक्रमणे निघाली पण काही आणि मोठमोठ्या लोकांची अतिक्रमणे तशीच आहेत. यामुळे वाहतूक कोंडी ही समस्या कायमचीच झाली आहे. नेमके ठेकेदार कोणाचेच ऐकत नाही. अतिक्रमणे निघत नाहीत. याला अभय कोणाचे आहे. याचीच चर्चा सुरू आहे.
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग काम करताना गटारांचे काम कसे का असेना झाले आहे. अनेक ठिकाणी वाकडे तिकडे गटार झाले आहे. गटाराबाहेर नगरपरिषदेची दहा फूट जागा आहे पण सध्या अनेक ठिकाणी गटारावर पक्के काम करून टपऱ्या टाकल्या आहेत. आणि विशेष म्हणजे अनेक मोठ मोठ्या लोकांनी भाड्याने दिल्या आहेत. तेव्हा नगरपरिषद हे अतिक्रमण केव्हा हटवणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
जामखेड शहरातील खर्डा चौक ते बीड रोडवरील समर्थ हॉस्पीटल पर्यंतचा अपुर्ण रस्ता यामुळे ट्रॅफिक जाम ची समस्या तसेच अपुर्ण रस्ता कामातील बाहेर निघलेले गज हे धोकादायक बनले आहेत. समर्थ हॉस्पीटल समोर एक साईट शंभर फुट सिमेंट रस्ता बनवला आहे याला पंचवीस दिवस झाले पुढील काम ठप्प आहे तसेच रस्ता कामाच्या बाहेर निघलेले गज खुपच धोकादायक बनले आहेत. गजामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. ताबडतोब रस्ता काम पूर्ण व्हावे अशी मागणी होत आहे.
वीस दिवस झाले तरी रखडलेला रस्ता काम अद्याप सुरू झालेले नाही. यामुळे ट्रॅफिक जाम च्या समस्यांमुळे वाहनधारक व नागरिक हैराण झाले आहेत. एकतर बीड रस्ता रूंदी काही प्रमाणात कमी झाली आहे. अतिक्रमणे निघत नाहीत यामुळे मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
गटाराच्या बाहेर नगरपरिषदेची जागा आहे पाणीपुरवठा पाईपलाईन व शहरातील सांडपाणी गटार व्यवस्था यासाठी पण गटार नालीवर अतिक्रमणे झालेली आहेत. नगरपरिषद कधी व केव्हा हटविणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
जिल्हाधिकारी वीस दिवसांपूर्वी आले तेव्हा तहसीलदार धनंजय बांगर , गटविकास अधिकारी शुभम जाधव, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी अजय साळवे, शशिकांत सुतार सार्वजनिक बांधकाम विभाग, रवींद्र घुले तालुका कृषी अधिकारी, दिलीप तिजोरे सहायक निबंधक जामखेड, महावितरणच्या चव्हाण सहा आदी अधिकारी उपस्थित होते.
अनेक महिन्यांपासून समर्थ हॉस्पीटल ते खर्डा चौक हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यासाठी ठेकेदार व अधिकारी यांची जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी झाडाझडती घेत हा रस्ता तत्काळ झाला पाहिजे अशा सूचना अधिकारी व ठेकेदार यांना देण्यात आल्या होत्या तरीही रस्ता काम सुरू होत नाही.