साकत – सौताडा परिसरात बिबट्याची दहशत, जनावरांवरील हल्ले वाढले

0
1660

जामखेड न्युज——

साकत – सौताडा परिसरात बिबट्याची दहशत, जनावरांवरील हल्ले वाढले

सौताडा, भुतवडा, मोहा, साकत परिसरात बिबट्या नजरेस पडू लागले आहेत तर काही ठिकाणी बिबट्याने जनावरांवर हल्ला करत शिकार केली आहे तेव्हा नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. साकत परिसरात काही दिवसांपूर्वी माजी उपसभापती कैलास वराट यांना साकत घाटात गाडीला आडवा गेला होता तर काल काही लोकांना परत साकत परिसरात बिबट्या दिसला यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.

सौताडा व भूरेवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढत असून गेल्या काही दिवसांत अनेक जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडल्याने ग्रामीण भागात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सौताडा येथील शेतकरी राजू सानप यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने गाईवर हल्ला करत तिला ठार केले. या धक्कादायक घटनेनंतर शेतकरी भयभीत झाले असून दिवसाढवळ्या देखील शेतामध्ये जाण्यास कचरत आहेत.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली असून शेतकरी बांधवांना रात्री उजेड ठेवण्याचे, जनावरे गोठ्यात सुरक्षित बांधून निगराणी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सौताडा व भूरेवाडी परिसरात बिबट्याच्या सततच्या हालचालीमुळे शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.

या पार्श्वभूमीवर सौताडा गावचे सरपंच महादेव घुले यांनी सर्व शेतकरी बांधवांना तातडीचे आवाहन केले आहे. “परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. अनेक जनावरांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे आपल्या जनावरांची काळजी घ्या, सध्या काही दिवस त्यांना गोठ्यातच बांधून ठेवा व सतत लक्ष ठेवा,” असे आवाहन सरपंच घुले यांनी केले.

शेतकऱ्यांकडून परिसरात वनविभागाच्या गस्ती वाढवण्याची आणि तत्काळ उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

– चौकट –
शेतकऱ्यांनी एकटे फिरू नये, बॅटरी बरोबर ठेवावी, मोबाईलवर गाणे लावावी, शेळ्या,मेंढ्या,वासरी कुंपणाच्या आत लाईटच्या उजेडात ठेवाव्यात आवाजाच्या ध्वनी वापराव्यात संध्याकाळी लाईट वस्तीवरील चालू ठेवावी तसेच स्वतःचे संरक्षण करावे असे आवाहन शेतकऱ्यांना केले.

मोहन शेळके (वनपरिक्षेत्र अधिकारी कर्जत जामखेड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here