जामखेड न्युज – – –
भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील अनेक सणवार येत असून मोठ्या थाटात ते साजरे केले जातात. विशेष म्हणजे श्रावण महिना सुरु झाला की, मांसाहार पूर्णपणे टाळला जातो. या काळात सणवार येत असल्यामुळे साधारणपणे मांसाहार केला जात नाही असं म्हटलं जातं. परंतु, सणसमारंभांसोबतच श्रावणात मांसाहार न करण्यामागे काही वैज्ञानिक कारणंदेखील आहेत. त्यामुळे ती कारणं कोणती ते पाहुयात.
सध्याच्या काळात पाहिलं तर प्रत्येक परंपरेला विज्ञानाची जोड देण्यात आली आहे.त्यामुळे श्रावणात मांसाहार न करण्यामागेही काही महत्त्वाची वैज्ञानिक कारणं आहेत. यात महत्त्वाचं कारण म्हणजे वातावरणात झालेला बदल आणि प्राण्यांचा प्रजनन काळ….म्हणून श्रावणात मांसाहार करु नये
१. पावसाळ्यात वातावरणातील ओलसर व दमटपणा वाढलेला असतो. त्यामुळे अशा वातावरणात मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढत असतो. त्यामुळे असं मांसाचं सेवन केल्यामुळे अनेक शारीरिक व्याधी उद्भवू शकतात. त्यामुळे श्रावणात मांसाहार करणं टाळावं.
२. श्रावण महिना हा खासकरुन प्राण्यांच्या प्रजननाचा काळ मानला जातो. या कालात मासे व अन्य प्राण्यांची गर्भधारणा होत असते. त्यामुळे या प्रजनन काळात मासेमारी सातत्याने होत राहिली. तर माशांच्या प्रजाती धोक्यात येऊ शकतात. माशांचं प्रजनन झालं नाही तर त्याच्या प्रजाती नष्ट होऊ शकतात. त्यामुळे या काळात मासे किंवा अन्य नॉनव्हेज खाण्यास मनाई केली जाते.
३. वातावरणातील बदलाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यातच पावसाळ्यात आपली पचनशक्ती थोडी मंदावली असते. त्यातच मांस, मटन, मासे हे पदार्थ खाल्ल्यावर ते पचायला जड जातात. म्हणूनच, श्रावणात व खासकरुन पावसाळ्यात शक्यतो नॉनव्हेज पदार्थ टाळावेत.