श्रीरामपूरमध्ये अचानक अतिक्रमण हटाव मोहीम, जामखेड मधील अतिक्रमणे कधी निघणार? जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अतिक्रमणे निघतात जामखेड मधील का निघत नाहीत

0
497

जामखेड न्युज——-

श्रीरामपूरमध्ये अचानक अतिक्रमण हटाव मोहीम, जामखेड मधील अतिक्रमणे कधी निघणार?

जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अतिक्रमणे निघतात जामखेड मधील का निघत नाहीत

श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणांविरोधात नगरपालिकेने पुन्हा एकदा कठोर पवित्रा घेत कारवाई सुरू केली. बुधवारी सकाळपासून सोनार गल्ली परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत अनेक अतिक्रमित दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. व्यापाऱ्यांनी प्रशासनावर अन्यायाचा आरोप करीत संताप व्यक्त केला. श्रीरामपूर नगरपालिका अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करते तसे जामखेड नगरपरिषद कधी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

श्रीरामपूर पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानदारांना तीन दिवसांपूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला कोणतीही दाद मिळाली नाही. अखेर पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात ही मोहीम पूर्ण केली. बुलडोझर व जेसीबीच्या साहाय्याने दुकाने पाडल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. यावेळी व्यापाऱ्यांनी आक्षेप नोंदविताना सांगितले की, आमच्याकडे जागेची वैध खरेदी कागदपत्रे आहेत. तरीही आमची दुकाने अतिक्रमणात कशी धरली जातात? तसेच, जर अतिक्रमण हटवायचेच असेल, तर छत्रपती शिवाजी रस्त्यापासून मेन रोडपर्यंत असलेले सर्वच अतिक्रमण काढा. निवडक कारवाई करण्याचे कारण काय?

पालिकेच्या या कारवाईमुळे सोनार गल्लीत वातावरण तणावग्रस्त झाले होते. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी व्यापारी संताप व्यक्त करत होते. या कारवाईनंतर शहरातील इतर अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांमध्येही अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, प्रशासनाच्या या कारवाईने राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही नेत्यांनी कारवाईला समर्थन देत, अतिक्रमण हटविणे अपरिहार्य, असे म्हटले असले, तरी काहींनी या कारवाईत निवडक पद्धत अवलंबल्याचा आरोप केला. त्यामुळे ही कारवाई केवळ प्रशासनापुरती मर्यादित न राहता त्यास राजकीय रंग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नगरपालिकेने पोलिसांच्या मदतीने यापूर्वीही श्रीरामपूर शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली होती. त्यामध्ये मध्यंतरी खंड पडला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यावेळी व्यापाऱ्यांना पुनर्वसनाची हमी दिली होती. परंतु पुनर्रचनाच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे, असे असतानाच आता पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळातचही मोहीम सुरू झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अतिक्रमण हटाव मोहिमेचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

जामखेड शहरातील जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन वर्षांपासून रखडलेले आहे. शहरातील काम रखडलेले आहे. अतिक्रमणे तसेच आहेत. अतिक्रमणे निघत नाहीत रस्ता होत नाही. यामुळे अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात फुपाटा यामुळे गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अतिक्रमणे हटवलेली आहेत जामखेड मधील अतिक्रमणे का निघत नाहीत असा प्रश्न जनता विचारत आहे. नेमकी काय अडचण आहे. हेच लोकांना कळत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here