प्रा. राम शिंदे व त्यांच्या मातोश्रींची बदनामी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी यासाठी जामखेड भाजपा आक्रमक
बदनामी करणाऱ्यावर कडक कारवाई करावी – संजय काशिद
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वक्तव्याची मोडतोड करून एका वर्तमानपत्राने चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले. त्याच वृत्ताच्या आधाराने सोशल मीडियावर घृणास्पद, अश्लिल आणि अपमानास्पद पोस्ट लिहिणाऱ्या संदीप पाटील या माथेफिरू व्यक्तीविरोधात जामखेड भाजप आक्रमक झाली आहे.
याबाबत कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आज (दि. 21 ऑगस्ट) भाजपच्या शिष्टमंडळाने जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनातून केली आहे. बदनामी करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरेल असे भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांनी सांगितले.
विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी कर्जत येथे नुकत्याच झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात “एक देश में दोन निशाण नहीं चलेंगे” हा भारतीय जनता पक्षाचा काश्मीरविषयी ठाम आणि राष्ट्रीय विचार मांडला होता.
मात्र या विधानाची मोडतोड करून एका दैनिकाने वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर संदीप पाटील या व्यक्तीने सोशल मीडियावर प्रा. राम शिंदे व त्यांच्या मातोश्रींविषयी अश्लाघ्य, अमानुष आणि मानवतेला काळिमा फासणारे वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आला.
या प्रकारामुळे शिंदे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “या वक्तव्यामुळे केवळ आमचे नेते राम शिंदे यांचीच नव्हे तर विधानपरिषदेच्या प्रतिष्ठित खुर्चीचीही बदनामी झाली आहे. त्यामुळे संदीप पाटीलवर कडक कायदेशीर कारवाई केली नाही तर भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील,” असा इशारा शहर भाजपा मंडळ अध्यक्ष संजय (काका) काशीद यांनी दिला.
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी भाजप शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले. यावेळी भाजप नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात, भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद,पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र सुरवसे, जिल्हा उपाध्यक्ष अजय काशीद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, संचालक डाॅ. गणेश जगताप, संचालक नारायण जायभाय, संचालक विष्णू भोंडवे, तसेच मनोज कुलकर्णी, प्रविण बोलभट, उध्दव हुलगुंडे, प्रा. संजय राऊत, विठ्ठल राळेभात, सुभाष जायभाय यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.