दुर्दैव! ग्रेट ब्रिटनकडून भारतीय महिला हॉकी संघाचा ४-३ ने पराभव; कांस्यपदकाचं स्वप्नभंग

0
242
जामखेड न्युज – – – 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्य पदकाचं स्वप्न भंगलं आहे. ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघाला कांस्य पदकाची कमाई करण्यात यश मिळालं नाही. राणी रामपालच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ब्रिटन संघाने ४-३  ने पराभूत केलं. यासोबतच महिला हॉकीच्या इतिहासात ऑलिम्पिकमधीलं पहिलं वहिलं पदक पटकवण्याच्या आशाही धुळीला मिळाल्या.
मॅचमध्ये काय झालं…?
भारत आणि ग्रेट ब्रिटनमध्ये कांस्य पदकासाठी हा सामना पार पडला. सामन्याच्या पहिला मिनिटापासूनच दोन्ही संघांनी आक्रमक रुप धारण केलं होतं. पहिला क्वार्टर ग्रेट ब्रिटनने गाजवला. परंतु या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं… पहिल्या क्वार्टरमधील १५ मिनिटांच्या खेळानंतर एकाही संघाला गोल करता आला नाही. पहिल्या १५ मिनिटांचा खेळ झाल्यानंतर दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचे तीन गोल
दुसऱ्या क्वार्टरच्या सुरूवातीलाच ब्रिटनने गोल करत १-० ची आघाडी मिळवली. त्यानंतर ब्रिटनने ही आघाडी बराच वेळ टिकवली. नंतर ब्रिटनने दुसरा गोल करत सामन्यात २-० ने आघाडी मिळवली. या गोलनंतर अवघ्या दोन मिनिटांमध्ये भारताच्या गुरजीत कौरने भारताकडून पहिला गोल केला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या मिनिटाला सलीमा तीतीने भारतासाठी मिळवलेल्या पेनल्टी कॉर्नरवरही गुरजीतने गोल करत सामना २-२ च्या बरोबरीत आणला. या पेनल्टी कॉर्नरनंतर पाच मिनिटांनी हाफ टाइमच्या एक मिनिट आधी भारताने आपला तिसरा गोल नोंदवला. भारतीय संघाने दुसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या नऊ मिनिटांमध्ये तीन गोल करत सामन्याच्या पूर्वाधात ३-२ ची आघाडी मिळवली होती.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये ब्रिटनकडून 1 गोल
तिसऱ्या क्वार्टरचा खेळ सुरू झाल्यानंतर सात मिनिटांमध्येच ब्रिटनने इक्वलायझर गोल केला आणि सामना ३-३ च्या बरोबरत आणला. या क्वार्टरमध्ये ब्रिटन आणि भारत दोघांनाही आपल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात अपयश आलं. तिसऱ्या क्वार्टरनंतर सामना पुन्हा ३-३ च्या बरोबरीत होता.
चौथ्या क्वार्टरच्या सुरूवातीलाच ब्रिटनचा चौथा गोल
चौथ्या क्वार्टरचा खेळ सुरू झाल्यानंतर ब्रिटनने तिसऱ्या मिनिटालाच गोल करत सामन्यात ४-३ ची आघाडी मिळवली. ही आघाडी निर्णायक ठरली. सामन्याच्या उर्वरित काही मिनिटे अतिशय थरार पाहायला मिळाला. परंतु भारताला गोल करण्यात अपयश आलं. सरतेशेवटी ब्रिटनने भारताला ४-३ ने पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here