सिंधुदुर्गात ढगफुटी, तेरेखोल नदीला पूर तर तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली!!! 

0
254
जामखेड न्युज – – – – 
कोकणात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला अति मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. चिपळूण आणि महाड येथील पूरस्थितीने गंभीर रुप धारण केले आहे. हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. बचाव आणि मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात ढगफुटी झाल्याने कर्ली आणि तेरेखोल नदीला पूर आला आहे. नदीकाटची अनेक गाव पाण्याखाली गेली आहेत. माडखोल, सावंतवाडी आंबोली मार्गावर तीन ते चार फूट पाणी आले आहे. दोडामार्ग तिलारी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.
*तेरेखोल नदीला महापूर बाजारपेठ पाण्याखाली*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने तेरेखोल नदीला पूर आला. पुराचे पाणी बाजारपेठेत घुसल्याने व्यापारी धास्तावले आहेत.  बांदा शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. काही दुकानात पाणी गेल्याने दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.  तर वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे पूल पाण्याखाली गेल्याने वेंगुर्ले मार्गे बेळगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कणकवली, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
*कोल्हापूर सांगलीत पुराचा धोका वाढला*
दरम्यान, राज्यात मुसळधार पावसाने हाहा:कार उडवला आहे. कोकणातील चिपळूण, महाड आणि खेड, संगमेश्वर येथे पूरस्थिती कायम आहे. रायगड जिल्ह्यात महाड येथे पूरस्थिती गंभीर असली तरी पाणी ओसरु लागल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मदतकार्य सुरु झाले आहे. कोल्हापूर आणि सांगलीत पुराचा धोका वाढला आहे. सांगली येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानकपणे वाढ झाल्याने नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. आयर्विन पुलाची पाणीपातळी 38 फुटांवर पोहोचली आहे. शहरातील 50 कुटुंबांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले आहे. नदीकाठच्या उपनगरात पाणी शिरले आहे. तर अनेक नागरिकांनी स्वतः स्थलांतर सुरु केले आहे.
*कोयना धरण क्षेत्रात तुफान पाऊस*
कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरण क्षेत्रातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानकपणे वाढ झाल्याने सांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड, दत्तनगर परिसर या भागात पुराच पाणी शिरल्याने नागरिकांत भीतीचे वातावण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here