ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेच्या पदाधिकारी, अधिकारी व संचालकासह 19 जणांवर फसवणूक प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

0
629

जामखेड न्युज——

ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेच्या पदाधिकारी, अधिकारी व संचालकासह 19 जणांवर फसवणूक प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

 

बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटीमध्ये जामखेड मधील सर्वसामान्य खातेदारांचे ९० कोटी रूपये अडकले असून या खातेदारांसह इतरही खातेदारांचे हक्काचे पैसे परत देण्यात यावेत आणि या संस्थेसह अशा सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या संस्थांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन यात लक्ष घालून ठेवीदारांचे पैसे मिळावेत अशी मागणी केली आहे.

याचबरोबर जामखेड शाखेतील काही खातेदारांनी ज्ञानराधा मल्टिस्टेट संस्थेच्या पदाधिकारी, अधिकारी व संचालकासह 19 जणांवर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, अधिकारी व सर्व संचालकासह 19 जणांवर ठेवीदारांची 1 कोटी 10 लाख 68 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला महाराष्ट्र ठेवीदारांच्या ( वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 नुसार भारतीय न्याय संहिता बिएनएस 2023 नुसार 316 (2), 316 (5), 318 (4), 61(2) प्रमाणे गुन्हा दि. 7 रोजी दाखल झाला आहे.

जामखेड पोलीस स्टेशनला नितीन राघाजी राजपुरे यांनी फिर्याद दिली की, सन 2022 मध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट – कॉ क्रेडीट सोसायटी जि. बीड, शाखा जामखेडचे अध्यक्ष सुरेश कुटे, त्यांची पत्नी संचालक अर्चना कुटे व सर्व संचालक, बॅंक मॅनेजर व कर्मचारी यांनी वारंवार संपर्क करून आमची बॅंक खूप मोठी असून इतर बॅंकेपेक्षा जास्त व्याज दर एफडीवर देत असून तुम्ही फिक्स डिपॉझिट करा असे सांगितले त्यानुसार सदर संस्थेत चार लाख डिपॉझीट केले यानंतर आरडी पुस्तकात तीन लाख अठरा हजार, आणि वडीलांनी तीन लाख रुपयांची एफडी केली. अशा प्रकारे माझी व वडीलांची दहा लाख अठरा हजार रुपये ठेव ठेवली होती.

11 आँक्टोबर 2023 मध्ये जामखेड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्था बंद दिसली म्हणून शाखा व्यवस्थापक सचिन खांडे यांना फोन केला असता त्यांनी तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याचे सांगितले यावेळी जवळपास 500 ठेवीदार जमा झाले होते. यानंतर आम्ही सर्वजण जामखेड तहसीलदार यांची भेट घेतली असता त्यांनी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे व त्यांची पत्नी संचालक आर्चना कुटे यांना फोन केला असता त्यांनी लवकरात लवकर बॅंक चालू करू असे खोटे आश्वासन देऊन ठेवीदार व सरकारची फसवणूक केली.

त्यांनी ठेवीदारांचे पैसे वैयक्तिक वापरात प्रॉपर्टी, शेअर बाजार, ट्रान्सपोर्ट कंपनी, तिरूमला आँईल व इतर व्यवसायात गुंतवणूक केली आहे. तसेच माझे सहकारी मित्र प्रमोद राऊत 32 लाख 50 हजार, प्रविण सानप 10 लाख, महारुद्र नागरगोजे 9 लाख, अरूण सुतार 42 लाख, ऋषिकेश डुचे 3 लाख, उदयकुमार दहातोंडे 40 लाख असे एकूण 1 कोटी 10 लाख 68 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी, संचालक अर्चना कुटे, अशिश पाटोदेकर, वसंत सटाले, वैभव कुलकर्णी, कैलास मोहीते, शिवाजी पारसकर, रवींद्र तांबे, रेखा सटाले, रघुनाथ खरसाळे, रवींद्र यादव, सुशील हाडुळे, सचिन खांडे सर्व राहणार बीड, आशा पाटील रा.सोलापूर, नारायण शिंदे रा. अंबड जिल्हा जालना, दादाराव उंदरे रा. वाशी जिल्हा धाराशिव, कल्याण गोरे पाटोदा जि. बीड, राजेंद्र पोकळे रा. अमळनेर ता. शिरूर, जि. बीड अशा 19 जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here