जामखेड न्युज ——–
वडिलधाऱ्यांनी सेवानिवृत्त होणे आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार
काहींना पहिल्याच टर्मला राज्याचा नेता होण्याची घाई झाली

अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासासाठी डॉ सुजय विखे पाटील खासदार असणे आवश्यक आहे. विखे पाटील घराण्याचे समाजकारण व राजकारणात खुप मोठे योगदान आहे. आम्ही वडिलधाऱ्यांचा आदर करतोत पण वडिलधाऱ्यांनी वय झाल्यावर सेवानिवृत्त होणे आवश्यक आहे. सध्या मतदारसंघात पहिल्या टर्म मध्ये आमदार झालेल्यांना राज्याचा नेता होण्याची घाई झाली आहे. असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना लगावला व डॉ सुजय विखे पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत, बाजार तळ येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार प्रा. राम शिंदे, उन्मेष पाटील, बाळासाहेब नाहटा, प्रविण घुले, अंबादास पिसाळ, प्रा. सचिन गायवळ, अजय काशिद, प्रदीप टाफरे, महेश निमोणकर, राजेंद्र नागवडे, बापुसाहेब नेटके, अशोक खेडकर, शरद कार्ले, डॉ. भगवानराव मुरूमकर, मंगलदास बांदल, राजेंद्र गुंड, बाळासाहेब शिंदे, काकासाहेब तापकीर, नानासाहेब निकत, पानसरे, संतोष धुमाळ, सुरज रसाळ, अल्लाउद्दीन काझी, शहाजीराजे भोसले, शांतीलाल कोपनर, अक्षय शिंदे यांच्या सह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, सोशल इंजिनिअरिंग साठी माझ्या वाट्याची जागा आम्ही महादेव जानकर यांना दिली. आम्ही सर्व जाती जमातींना बरोबर घेऊन राजकारण करत आहोत. आम्ही सकाळी सहाला कामाला सुरुवात करतो ढगात गोळ्या मारून काही होत नाही.एमआयडीसी च्या जागेत कर्जतचे शेतकरी का नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. आपल्या बापजाद्यांच्या जमीनी विकू नका असेही सांगितले. कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व निधी मीच दिला आहे. तिजोरी माझ्या कडे होती. रोहित पवार यांनी अडीच वर्षात एमआयडीसी का केली नाही. याचे उत्तर रोहित पवार यांनी द्यावे असे आवाहन अजित पवार यांनी केले.

यावेळी बोलताना उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, देशहितावर विरोधक बोलत नाहीत. विरोधक भुलवाभुलवी करतात गेल्या पंचेचाळीस दिवसात एकदाही पारनेर तालुक्यात काय केले हे सांगितले नाही. अजित दादांनी भरपूर निधी दिला पण निधी कोठे गेला एकदा पारनेर तालुक्यातील मित्र नातेवाईक यांना फोन लावून विचारा ते बरोबर सांगतील समोरचा उमेदवार कसा आहे ते त्यांचा अनुक्रम दोन आहे ते दोन नंबर वालेच आहेत.

यावेळी बोलताना आमदार प्रा. राम शिंदे म्हणाले की, दादांच्या आदेशानुसार एमआयडीची अधिसूचना निघाली आहे. रोहित पवार यांनी एमआयडीचा आदेश दाखवावा असे आवाहन केले तसेच कर्जत जामखेडच्या विद्यमान आमदाराने शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही उद्योगपतींच्या फायद्यासाठी सगळा आटापिटा सुरू आहे. दोन तीन वर्षांत उद्योगपतींनी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किंमतींनी खरेदी केल्या पाणीपुरवठा, तुकाई चारी ही कामे मीच केली आहेत.






