जामखेड न्युज——
धनगर आरक्षणाचा लढा तीव्र करणार – बाळासाहेब दोडतले
आरक्षणाची आत्महत्या केलेल्या खर्जे कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
गेल्या ७० वर्षापासून धनगर जमातीवर शासन अन्याय करत आहे. हक्काचे अनुसूचित जमातीचे आरक्षण देत नाही. चौंडी येथील उपोषणावेळी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ५० दिवसाची मुदत संपत आली आहे. मुदताअंती आरक्षण न दिल्यास धनगर आरक्षणाचा लढा तीव्र करणार आहे. आरक्षणासाठी बिरदेव खर्जे या युवकांने आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पाच लाखाची मदत दिली आहे. धनगर आरक्षणासाठी पाठपुरावा करू असाही शब्द दिला आहे.असे प्रतिपादन यशवंत सेना प्रमुख तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी केले.
आबाचीवाडी (कोणीकोनूर ) (ता.जत) तेथे धनगर आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बिरदेव खर्जे कुटुंबीयांना यशवंत सेनेच्या माध्यमातून तानाजी सावंत यांच्याकडून पाच लाखाची मदत देण्यात आली. सांगलीचे नगरसेवक विष्णू माने यांनीही मदत दिली यावेळी खर्जे कुटुंबाचे सात्वन केले यावेळी बोलत होते. २२ ऑक्टोंबर रोजी बिरदेव खर्जे या युवकांनी समाजाला आरक्षण मिळत नाही आरक्षण मिळावे म्हणून चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती.
यावेळी सांगली महानगरपालिकेचे नगरसेवक विष्णू माने, माणिकराव दांगडे – पाटील , चौंडी येथे सलग २१ दिवस उपोषण केलेले अण्णासाहेब रुपनवर , विक्रम ढोणे, निवांत कोळेकर, रेवाप्पा खोत , माजी सरपंच लक्ष्मण पाटील ,विजय रूपनुर आदी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक विष्णू माने म्हणाले, धनगर आरक्षणासाठी राज्यात समन्वय समिती स्थापन करून एकाच वेळी आंदोलन करणार आहोत. धनगर समाज आदिवासी समाज आहे. घटनेमध्येच एसटी आरक्षणाची तरतूद आहे परंतु घटनेत धनगर ऐवजी धनगड असे समाविष्ट आहे. वास्तविक पाहता धनगड हे अस्तित्वात नाहीत . शासनाने वेळ काढू पणा न करता आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी अन्यथा धनगर आरक्षण आंदोलन व्यापक होणार आहे. शासनाने गांभीर्य घेऊन ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. शक्तीप्रदत समितीची मागणी केलीच नाही. घटनादत्त धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करून प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे. शासनाने दिलेल्या मुदतीत आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा जमातीच्या रोषास सामोरे जावे लागेल असा इशाराही माने यांनी दिला.