Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या शासन आपल्या दारी” कार्यक्रमातून विकासगंगा प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या दारी ...

शासन आपल्या दारी” कार्यक्रमातून विकासगंगा प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या दारी शिर्डी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमातून

0
232

जामखेड न्युज——

“शासन आपल्या दारी” कार्यक्रमातून विकासगंगा प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या दारी

शिर्डी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमातून

 

“शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाद्वारे शासन प्रत्यक्षात आमच्या दारी विविध योजनेच्या माध्यमातून विकासाची गंगा घेऊन आले. कार्यक्रमातून अनेक योजनांचा लाभ मिळाला. विद्यमान शासन हे गोरगरिबांचे व सर्वसामान्यांचे शासन असल्याची प्रचिती यातून मिळाली. शासनाच्या विविध योजनांच्या लाभामुळे जगण्याला अधिक बळ मिळाल्याची भावना शिर्डी येथे आयोजित जिल्हास्तरीय “शासन आपल्या दारी” कार्यक्रमातून अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या.


*शासनाच्या मदतीमुळे जीवनाला नवी दिशा मिळून जगण्याला मिळाले अधिक बळ*
समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेतून ट्रॅक्टर खरेदेसाठी अनुदान मिळाले. ट्रॅक्टरमुळे शेतीची मशागत करणे अधिक सुलभ होऊन उत्पन्नात भरघोस वाढ झाल्याचे वाकडी ता. राहाता येथील शिवाजी भाऊसाहेब खरात यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
मी भूमिहीन होतो. समाजकल्याण विभागामार्फत ८१ आर जमीन मिळाली. या जमिनीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी ३ लक्ष १५ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. शासनाच्या या योजनेमुळे जीवनच बदलून गेले. जीवनाला एक नवी दिशा मिळून जगण्याला अधिक बळ मिळाल्याची भावनाही श्री खरात यांनी व्यक्त केली.
*शासनाच्या मदतीमुळे महिला बनल्या आत्मनिर्भर*
स्वयंरोजगार कार्यक्रमांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे मातापूर ता. श्रीरामपूर येथील बचतगटास दीड लक्ष रुपयांचे कर्ज मिळाले. या मदतीमधून गटातील महिला दुग्धव्यवसाय करत असून यातून गटाला चांगले उत्पन्न मिळत आहे. महिला चूल आणि मूल यातून बाहेर निघून आत्मनिर्भर बनत आहेत. शासनाने केलेल्या या मदतीमुळे महिला अधिक सक्षम होतील, अशी भावना पुजा सुनील गायके यांनी व्यक्त केली.
*आर. टी. ई. मुळे मुलाच्या भविष्याला कलाटणी*
मी जयश्री सचिन जावळे रा. सोनेवाडी ता.कोपरगाव. माझा मुलगा वेदांतला दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे ही माझी इच्छा होती. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मोठ्या शाळेची फीस परवडत नाही. शासनाच्या आर. टी. ई. योजनेतून वेदांतला वत्सल मॉडेल स्कूल, पोहेगाव येथे पहिल्या वर्गात प्रवेश मिळाला. शासनाच्या या योजनेमुळे माझ्या मुलाला उच्च शिक्षण मिळून त्याचे भविष्य उज्ज्वल होणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.


*शासनाच्या मदतीमुळे कुटुंबाला मिळाला आधार*
घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची. जगण्याचे साधन नव्हते. माझ्या अंगी असलेल्या शिवणकलेला शासनाच्या मदतीची जोड मिळल्यामुळेच कुटुंबाला आधार देऊ शकल्याची भावना देवळाली प्रवरा ता. राहुरी येथील नीता मधुकर उंडे यांनी व्यक्त केली.
आर्थिक विकास महामंडळामार्फत टेलरिंग व्यवसायासाठी २ लक्ष रुपयांचे अनुदान मिळाले. या अनुदानातून शिलाई मशीन व इतर साहित्य खरेदी केले. आजघडीला टेलरिंग व्यवसायातून दर महिन्याला ७ ते ८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असून शासनाने केलेल्या या मदतीबद्दल शासनाचे आभारही त्यांनी व्यक्त केले आहेत.
*गायगोठा योजनेतून दुग्धव्यवसायाला मिळाली भरारी*
मी ग्रामीण भागातील महिला आहे. आमच्या गावात दुग्धव्यवसाय हाच प्रमुख व्यवसाय आहे. शासनाच्या गायगोठा योजनेंतर्गत दीड लक्ष रुपयांचा लाभ मिळाल्यामुळे दुग्धव्यवसायाला भरारी मिळाली असल्याची भावना हवेली ता.संगमनेर येथील शारदा भाऊसाहेब कडलक यांनी व्यक्त केली.
*फूड प्रोसेसिंग प्रशिक्षणातून उद्योजक बनण्याचे स्वप्न झाले पूर्ण*
उद्योजक होण्याचे स्वप्न लहानपणापासून मनी बाळगले होते. जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागामार्फत फूड प्रोसेसिंगच्या मोफत प्रशिक्षणातून उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले असल्याची भावना कान्हेगाववाडी ता.कोपरगाव येथील विध्यार्थ्यांनी कोमल भागवत हिने व्यक्त केली.
शासनाच्या मोफत प्रशिक्षणाची माहिती महाविद्यालयातून मिळाली. फूड प्रोसेसिंग तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वतःचा केक बनवण्याचा उद्योग थाटला. या उद्योगातून दरमहा १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असून भविष्यात हा उदयोग मोठा करण्याचा मानसही व्यक्त केली.
शिर्डी येथे झालेल्या “शासन आपल्या दारी” जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासनाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. विद्यमान शासन हे सर्वसामान्यांचे व गोरगरिबांचे शासन असल्याची प्रचिती आल्याचे भाव प्रत्येक लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!