जामखेड न्युज——
शेतकरी कुटुंबातील विनोद फाळके झाले पोलीस उपनिरीक्षक
जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर पोलीस दलात काम करत असताना अधिकारी होण्याचे ध्येय ठेवून जामखेड तालुक्यातील शिऊर (फाळकेवाडी) येथील शेतकरी कुटुंबातील विनोद फाळके यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विनोद शहाजी फाळके रा. शिऊर फाळकेवाडी असे पोलीस उपनिरीक्षक झालेल्या शेतकरी कुटुंबातील मुलाचे नाव आहे. विनोद हा गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस दलात एसआरपीएफ मध्ये जिद्द आणि कष्टाच्या जोरावर भरती झाला होता. घरात कुठलाही शैक्षणिक अथवा राजकीय वारसा नसतानाही आपण मोठा अधिकारी व्हायचे व आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करायचे असा निश्चय विनोद ने केला होता.विनोद फाळके याचे प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते चौथी हे फाळकेवाडी या ठीकाणी झाले तर पाचवी ते सातवी हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिऊर तर इयत्ता आठवी ते दहावी भैरवनाथ विद्यालय शिऊर तर पुढील शिक्षण जामखेड येथिल ल. ना होशिंग विद्यालयात झाले होते.

पुढे पोलीस भरती झाल्यानंतरही विनोद याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरूच ठेवली होती. अखेर २०२१ च्या झालेल्या एमपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच लागला व यामध्ये तो उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक झाला. विनोद याचे आईवडिल शेती करत आहेत तर त्यांचे मोठे बंधू सेवक फाळके हे पण शेतीच करतात तसेच ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. विनोद फाळके हा पोलीस उपनिरीक्षक झाला त्यामुळे त्याच्या यशाबद्दल शिऊर व फाळकेवाडी येथील ग्रामस्थांनी त्याचा नुकताच शिऊर या ठिकाणी सन्मान केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गौतम (आण्णा) उतेकर, सरपंच हनुमंत उतेकर, एकनाथ चव्हाण सर, बापुसाहेब माने, श्रीरामदादा कडु, भगवान समुद्र सर, रघुनाथ तनपुरे, प्रगतशील शेतकरी बाळासाहेब शिऊरकर, ग्रा.प.सदस्य भाऊसाहेब पिंपरे, भैरवनाथ विद्यालयाचे संस्था प्रमुख वाघ रमेश व मुख्याध्यापक संतोष रत्नपारखी सह सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.





