जामखेड प्रतिनिधी
कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार सध्या नाशिक दौऱ्यावर असताना कार्यकर्ते आपलं ऐकतंच नाही असं म्हणण्याची वेळ आलीय. नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवन येथे रोहित पवार यांचं कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती. मात्र, स्वागत करताना फिजीकल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला. काही कार्यकर्त्यांनी तर तोंडाला मास्क न लावताच रोहित पवारांचा सत्कार केला. त्यामुळे कार्यक्रमातच नियमांचा भंग झाला. यावर माध्यमांनी रोहित पवारांना विचारणा केली असता, ते म्हणाले ‘मी सांगितलं होतं, मात्र कोणी ऐकलंच नाही’. त्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी अनेक विषयांना हात घातला
रोहित पवार म्हणाले, “मी पदाधिकाऱ्यांना फिजीकल डिस्टन्सिंगबाबत सांगितलं होतं. मात्र, अनेक कार्यकर्ते इथे आले. मी सांगितलं मास्क लावा, मात्र त्यांनी ऐकलं नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी असं मी लोकांना आवाहन करतो.”
‘ते कोल्हापूरला जातील, पण कोल्हापूरकर स्वागत करतील का?’
चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरला परतण्याच्या वक्तव्यावर टोला लगावताना रोहित पवार म्हणाले, “ते कोल्हापूरला जातील, पण कोल्हापूरकर त्यांचं स्वागत करतात का हे बघू.”
“आमदार नियुक्तीबाबत विलंब होत असेल तर सर्वसामान्य लोकही आक्षेप घेतात. आपण संविधानाला धरून चालणार आहोत. आपल्या पदाचा वापर कोणी असा करत असेल आणि राजकीय हेतुने काम करत असतील तर ते लोकांनाही पटणार नाही,” असं म्हणत रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरही निशाणा साधला. तसेच एकनाथ खडसे ईडीला सामोरे जातील. ईडीसारख्या संस्थेचा राजकीय पद्धतीने वापर होत असेल तर ते अयोग्य आहे, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.
रोहित पवार यांनी यावेळी पार्थ पवार यांच्या विषयावरही भाष्य केलं. “पवार साहेब, दादा, तिथले पालकमंत्री निर्णय घेतील. कार्यकर्ते बोलून जातात, पण निर्णय नेते घेतात. तिथे असलेल्या लोकांना योग्य तो न्याय दिला जाईल अस मला विश्वास आहे. परिस्थिती आणि कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेतली जाईल. कोणी अशी मागणी केली म्हटलं म्हणून लगेच ती पूर्ण होईल असं होत नाही.”