आमदार रोहित पवारांच्या माध्यमातू दिघोळला नवे ३३/११ वीज उपकेंद्र

0
175

 

जामखेड न्युज——

 दिघोळ आणि परिसरातील गावांची विजेची समस्या लक्षात घेऊन तिथे नवीन वीज उपकेंद्र उभारण्यात यावे यासाठी आ. रोहितदादा यांनी विशेष प्रयत्न केले होते. तसेच मतदारसंघातील विजेची असलेली सर्व अडचण दूर करण्यासाठी त्यांनी शासन दरबारी वेळोवेळी आवश्यक तो पाठपुरावा देखील केला. त्यांच्या प्रयत्नातून दिघोळ येथे नव्याने ३३/११ वीज उपकेंद्र उभारण्यात येणार आहे त्याला आता मंजुरी देखील देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आ. रोहित पवार यांनी सोडवल्याचे पाहायला मिळत आहे.

 

 

 

जामखेड तालुक्यातील दिघोळ, जातेगाव, जायभायवाडी, तेलंगशी, धामणगाव, माळेवाडी येथील शेतकऱ्यांच्या वीज पंपांना, गावातील घरगुती व इतर ग्राहकांना खर्डा येथील ३३/११ वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. परंतु उपकेंद्रापासून ही गावे २५ ते ३० किलोमीटर दूर असल्याने पुरेशा दाबाने व व्यवस्थित वीज पुरवठा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर दिघोळ येथे नवीन उपकेंद्र उभारल्यास या सर्व समस्या दूर होतील या अनुषंगाने आ. रोहित पवार यांनी नव्या उपकेंद्रास मान्यता मिळण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यातून आता नवे वीज उपकेंद्र दिघोळ येथे मंजूर झाले आहे. ज्यामुळे परिसरात अखंडित व उच्च दाबाने वीज पुरवठा होणार असून येथील शेतकऱ्यांच्या विजेच्या संदर्भातील अडचणी दूर होणार आहेत. यासोबतच खर्डा उपकेंद्रावर अवलंबून असलेल्या खर्डा, सातेफळ, लोणी, वाकी यांसह इतर वाड्या वस्त्यांनाही खर्डा उपकेंद्रावरील ताण कमी होणार असल्याने फायदा होणार आहे.

 

 

 

यापूर्वी नायगावला वीज उपकेंद्र मंजूर करून आणले होते. त्याचे काम देखील सध्या प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे आसपासच्या 7-8 गावांना फायदा होणार आहे आणि राजुरी उपकेंद्रवरील येणारा ताण कमी होणार आहे. यासोबतच मतदारसंघात काही ठिकाणी सोलार प्रकल्पदेखील उभारण्यात आले असून विविध ठिकाणी नवीन लिंक लाइनचे काम, नवीन विद्युत रोहित्र बसवणे, शेतातील नादुरुस्त झालेले रोहित्र त्वरित बदलून देणे अथवा दुरुस्त करून देणे यांसह अनेक ठिकाणी नव्याने वीज उपकेंद्रांची उभारणी करणे अशा पद्धतीने विजेच्या संदर्भातील विविध अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आमदारांच्या माध्यमातून होत आहे.

 

*चौकट*

*राशीनच्याही उपकेंद्राची क्षमता वाढवून होणार २० केव्ही*

राशीन येथील उपकेंद्रावर येणारा ताण लक्षात घेता त्याची देखील क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यानुसार आता राशीन येथील उपकेंद्राची पूर्वी असणारी १५ के.व्ही ची क्षमता ५ के.व्हीने वाढवून ती २० के.व्ही करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरात विजेचा होणारा लपंडाव कायमचा बंद होणार आहे. तसेच कर्जत तालुक्यातील राशीन येथील ३३/११ वीज उपकेंद्रावर अवलंबून असलेल्या चीलवडी, परीटवाडी, तळवडी येथील फिडरवर येणारा ताण आता क्षमता वाढल्याने कमी होणार असून परिसरातील हजारो वीजग्राहक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here