Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या शिंदे समर्थक व विरोधक आमनेसामने, मंत्र्यांच्या फलकाला काळे, शिंदेंच्या समर्थनाने प्रत्युत्तर!!!

शिंदे समर्थक व विरोधक आमनेसामने, मंत्र्यांच्या फलकाला काळे, शिंदेंच्या समर्थनाने प्रत्युत्तर!!!

0
246
जामखेड न्युज – – – 
 नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सामील राज्याचे रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांच्या फलकावर, त्यांच्या फोटोवर शिवसैनिकांनी काळे फासले तर त्यांच्या समर्थकांनी पुन्हा प्रत्युत्तर म्हणून संपर्क कार्यालयावर ‘आम्ही शिंदे साहेब समर्थक’ असा फलक लावला. विशेष म्हणजे, या फलकावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची छायाचित्रे या फलकावर आहेत. श्री. भुमरे यांच्यासह आमदार संजय शिरसाट आणि प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यालय आणि घरासमोर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे काही आमदार आधी गुजरातमध्ये व नंतर आसामला गेले आहेत. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणचे आमदार तथा रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे, सिल्लोडचे आमदार तथा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे, औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल आणि औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचा समावेश आहे.
                            ADVERTISEMENT 
 
संदीपान भुमरे यांचे औरंगाबादेत विभागीय क्रीडा संकुलाशेजारी संपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाहेर भुमरे यांनी गेल्या ८ जून रोजी झालेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वाभिमान सभेचा फलक लावला होता. या फलकावर उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र ठळकपणे लावण्यात आले होते. त्याशिवाय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचीही छायाचित्रे होती. त्याशिवाय संदीपान भुमरे यांचे आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती व श्री. भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांचेही छायाचित्र होते. या फलकावरील मंत्री श्री. भुमरे यांच्या छायाचित्राला शुक्रवार च्या रात्री काळे फासण्यात आले.त्यानंतर शनिवारी सकाळी भुमरे यांच्या समर्थकांनी हा ‌फलक बदलला आणि ‘आम्ही शिंदे साहेब समर्थक’ असा उल्लेख असलेला फलक लावला. या फलकावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे छायाचित्र ठळकपणे लावण्यात आले आहे. त्याशिवाय संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांचेही छायाचित्र आहे. ‘लोकांचा लोकनाथ एकनाथ’ असे घोषवाक्य या फलकावर दिसून येते. या फलकासह भुमरे यांच्या कार्यालयाला शनिवारी सकाळपासून पोलिस संरक्षण देण्यात आले. पोलिसांचा पहारा कार्यालयासमोर आहे.श्री. भुमरे यांच्याबरोबरच औरंगाबाद पश्‍चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्या कोकणवाडी येथील व औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या नारळीबाग येथील कार्यालयासाठी देखील पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. शुक्रवारपर्यंत या आमदारांच्या कार्यालयांना पोलिस बंदोबस्त नव्हता, शनिवारी सकाळपासून मात्र बंदोबस्त देण्यात आला. आमदारांच्या निवासस्थानी देखील बंदोबस्त देण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि त्याच्यासोबत महिला आणि पुरुष पोलिस शिपाई बंदोबस्तावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!