जामखेड न्युज——
कधीकाळी मोलमजुरी करणारा सुरज चव्हाण बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता
कधीकाळी 300 रुपये मुजरीवर जाणारा सूरज रिलस्टार झाला आहे. आता इंस्टाग्राम प्रोमोशन आणि यूट्यूब हे उत्पनाचे प्रमुख साधन आहे. तो अनेक ठिकाणी कार्यक्रमांच्या उदघाटन समारंभसाठी जात असतो. त्यासाठी तो 40-50 हजार रुपये मानधन घेतो.
बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आणि शेवटी तो क्षण आला ज्याची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता. महाराष्ट्राची मनं जिंकणारा सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. तर अभिजीत सावंतने दुसरे स्थान पटकावले. सूरज चव्हाणला बक्षीस म्हणून चांगली रक्कम मिळाली आहे. एवढेच नाही तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणाही केली.
‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा रविवारी फिनाले झाला. या संपूर्ण सीजनबद्दल मराठी चाहत्यांमध्ये एका ग्रामीण भागातील युवकाची क्रेझ निर्माण झाली होती. त्याला मराठी वाचता येत नव्हते. परंतु सोशल मीडियाने त्याला स्टार बनवले.
मग तो ‘बिग बॉस मराठी सीजन 5’मध्ये पोहचला. त्या ठिकाणी तो जसा वागला तसा चाहत्यांच्या मनावर राज्य करु लागला. त्याचे ग्रामीण भागातील भाषा ग्रामीण लोकांनाच नाही तर शहरी लोकांना भावली.
असा आहे सूरज चव्हाणचा प्रवास
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोडवे गावात सूरज चव्हाणचा १९९२ मध्ये जन्म झाला. त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्यामुळे त्याचे बालपण इतर सर्वसामान्य मुलांसारखे नव्हते. सूरज लहान असतानाच त्याचे वडिलाचे कर्करोगाने निधन झाले.
त्यानंतर आजारपणामुळे आईचे देखील निधन झाले. सूरजला 5 मोठ्या बहिणी आहेत. त्यांनी सूरजचा सांभाळ केला. आई वडिलांचे छत्र हरपल्यामुळे सूरजला मजुरी करावी लागली. त्याला 300 रुपये दिवसाला मिळत होते. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. त्याचे आठवीपर्यंत शिक्षण झाले असले तरी त्याला मराठी वाचता येत नाही.
असा सुरु झाला सोशल मीडियाचा प्रवास
सूरजला त्याच्या बहिणीच्या मुलाकडून टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफार्मची माहिती मिळाली. त्याने इतर कोणाच्या मोबाईलवरून एक व्हिडिओ बनवला. पहिलाच व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. मग त्याने मजुरीतून मिळालेल्या पैशातून मोबाईल मिळाला.
अन् त्याच्या हटके स्टाईलमुळे सोशल मीडियावर तो प्रचंड लोकप्रिय ला. त्याचे टिकटॉकवर लाखो फॉलोवर्स आहेत. पण संघर्ष त्याच्या जीवनात अजूनही होता. भारतात टिकटॉकवर बंदी आली. मग सूरजने हार मानली नाही. त्याने इंस्टाग्राम व यूट्यूबवर व्हिडिओ सुरु केले. त्या ठिकाणी प्रचंड यश मिळाले. त्याचे संवाद लहान लहान मुलांच्या तोंडात सहज ऐकायला मिळू लागले.