आराध्य नागरगोजेने केला ‘सपाटे’ या व्यायामप्रकारात विश्वविक्रम जामखेड तालुक्यातील दत्तवाडी च्या पहिलीच्या विद्यार्थ्याची प्रेरणादायी यशोगाथा

0
224
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – ( सुदाम वराट ) 
प्रेरणा व जिद्द यांचा समन्वय झाला आणि त्याला योग्य मार्गदर्शनाची साथ मिळाली; तर यशाला गवसणी घालता येते. तालुक्यातील धोंडपारगाव येथील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी येथे पहिलीतून नुकताच दुसरीत गेलेल्या आराध्य परशुराम नागरगोजे या विद्यार्थ्याच्या यशाची ही एक प्रेरणादायी सत्यकथा…………
         कोरोना महामारीमुळे वर्षभर शाळेचे तोंड देखील पाहता आले नाही याची खरे तर आराध्यला खंत वाटत असे. शाळा बंद; परंतु शिक्षण मात्र ऑफलाईन व ऑनलाईन माध्यमातून अखंड चालू होते. शालेय पाठ्यक्रमासोबतच अनेक ऑनलाईन उपक्रम व विविध स्पर्धा यांमध्ये आराध्य उत्साहाने व सातत्याने सहभाग घेत असे. एका वक्तृत्त्व स्पर्धेत ‘खरे कोरोना योद्धे : आरोळे परिवार’ या  विषयावरील भाषणातून  कोरोना काळात जामखेड येथील आरोग्यदूत व ज्येष्ठ समाजसेवक डाॅ.रवीदादा आरोळे व डाॅ.शोभाताई आरोळे यांनी केलेले राज्याला दिशादर्शक असे सेवाभावी सामाजिक कार्य आराध्य ने प्रभावीपणे मांडल्यामुळे त्याचे राज्यभरातून कौतुक झाले होते. महाराष्ट्र शासनाने बालदिनाचे औचित्य साधून घेतलेल्या भाषण स्पर्धेत *मी नेहरू बोलतोय’ या विषयावरील त्याच्या भाषणाचा नगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला होता. तर ‘परिवर्तनाच्या वाटा समूह महाराष्ट्र’ आयोजित वक्तृत्त्व स्पर्धेत ‘ म्हणून मला संभाजी महाराज आवडतात’ या विषयावरील त्याच्या प्रभावी भाषणाचा  राज्यात पाचवा क्रमांक आला होता.
          आराध्यचा मोठाभाऊ असलेल्या प्रतिकने जलद दोरीउड्या मारण्याच्या क्षेत्रात तब्बल चार विक्रम प्रस्थापित केले होते. तसेच हस्ताक्षर,वक्तृत्त्व ,शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध, क्रीडा इ.विविध स्पर्धांत त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे अनेक ठिकाणी सत्कार झाले होते. त्याला मिळालेली स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्र पाहून ‘आपण याच्या समान व्हावे’ असे छोट्या आराध्यला सारखे वाटत होते.”मला सुद्धा प्रतिकदादासारखा विश्वविक्रम करायचा” असे घरात तो नेहमी म्हणत असे.
          आराध्य त्याचे वडील परशुराम नागरगोजे व भाऊ प्रतिक यांचेसमवेत जामखेड शहरातील शिवनेरी अॅकेडेमीजवळील विस्तीर्ण मैदानावर रोज सकाळी व्यायामासाठी जात असे. मैदानावर नियमित येणा-या छोट्या आराध्यला पाहून सर्वांना त्याचे कौतुक वाटे. शिवनेरी अॅकेडेमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे हे त्याला सदैव प्रोत्साहित करत. पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुल येथे शिक्षण घेऊन आलेले सूरज पवार  हेदेखील त्यांच्या तालमीतील मुलांना घेऊन तेथे व्यायामासाठी येत असत, ते सपाटे मारताना पाहून आराध्यदेखील त्यांच्यासारखे सपाटे  मारण्याचा प्रयत्न करू लागला.रोज पाच-दहा-पंधरा अशा संख्येने तो आवडीने गंमत म्हणून मारू लागला.
          यानंतर कोरोनाच्या दुस-या लाटेच्या प्रभावामुळे राज्यात कडक लाॅकडाऊन पडले.परिणामी मैदान दुरावले, परंतु एक गंमत म्हणून काही दिवस मारलेल्या सपाट्यांचा मात्र आता आराध्यचा दैनंदिन छंद बनला होता. त्याचा तो नियमित सराव देखील करत असे.
          एके दिवशी सहज दोन्ही भावांत कोण जास्त सपाटे मारतो? याची स्पर्धा लागली, तेव्हा चक्क सलग 60 सपाटे मारून मोठ्या भावाला हरवल्याने आराध्य आनंदाने उड्या मारत आपला विजयोत्सव साजरा करू लागला व आईला आपला पराक्रम अभिमानाने सांगू लागला. आई ज्योती नागरगोजे यांनी यापूर्वी प्रतिकच्या दोरीउड्यांच्या विक्रमावर आधारित प्रेरणादायी यशोगाथा असलेले ‘गोष्ट विश्वविक्रमाची’ हे प्रसिद्ध पुस्तक लिहीले होते. तसेच कोरोना काळात मुलांचे शिक्षण बंद राहू नये यासाठी त्यांनी ‘आराध्य एज्युकेशन’ या युट्युबच्या शैक्षणिक वाहिनीची निर्मिती करून त्याद्वारे शेकडो विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले होते. आराध्यच्या या विजयोत्सवामुळे  लवकरच ‘सपाटे’ हा व्यायामप्रकार दोरीउड्यांप्रमाणेच कुटुंबातील दुस-या एका विक्रमाची नांदी ठरेल असे त्यांना वाटले.आपले मनोगत त्यांनी आराध्यच्या वडिलांकडे व्यक्त केले.आराध्यचे विक्रमवीर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची ही एक नामी संधी समजून वडिलांनी विक्रम प्रस्थापित करण्यासंबंधी सर्व चौकशी केली.दैनंदिन सराव,योग्य आहार आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन या त्रिसूत्रीच्या जोरावर विक्रमासाठीचा सर्व तपशील , अद्ययावत माहिती व आवश्यक पुरावे इंडिया बुक ऑफ रेकाॅर्डच्या कार्यालयास सादर केले.
          अखेर दि. १७ मे २०२१ रोजी ‘६ मिनिटे व २५  सेकंदांत सलग १०३  सपाटे मारणारा बालक’ म्हणून त्याची नोंद  ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड ‘मध्ये झाली . ‘आराध्यने वयाच्या अवघ्या ६ वर्षे व ९ महिने या कालावधीत केलेल्या या विश्वविक्रमावर शिक्कामोर्तब झाले.
            मागील वर्षी विविध स्पर्धांतून बक्षीस स्वरूपात मिळालेले तब्बल पाच हजार रूपये प्रतिकने बीडजवळील इन्फन्ट इंडिया या संस्थेतील एडसबाधित बालकांच्या अन्न व औषधोपचारासाठी समर्पित केले होते ,तर यावर्षी आराध्यने विविध स्पर्धांतील बक्षीस रक्कम दत्तवाडी शाळेला समर्पित केली. मोठ्या भावाने वयाच्या आठव्या वर्षी तर आराध्यने सातव्या वर्षी केलेला विश्वविक्रम यांमुळे एकाच घरात दोन विश्वविक्रमी गुणी मुले असल्यामुळे या पाल्यांप्रमाणेच ‘धन्य माता-पिता तयांचिया’ अशी नागरगोजे कुटुंबाविषयी गौरवाची व अभिमानाची भावना व्यक्त करून  प्रतिक व आराध्य यांसारख्या सर्वांगीण विकासात अग्रेसर ,सामाजिक भान आणि कुशाग्र बुद्धीमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचे आपण शिक्षक असल्याचा सार्थ अभिमान वाटत असल्याची भावना दत्तवाडी शाळेचे मुख्याध्यापक  मनोहर इनामदार यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here