खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत कर्जतमध्ये रंगणार राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार आयोजक आमदार रोहित पवार

0
169

जामखेड न्युज——

खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत कर्जतमध्ये रंगणार राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार

आयोजक आमदार रोहित पवार

गतवर्षीप्रमाणे याही वर्षी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन कर्जत शहरात करण्यात आले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मागच्या वर्षी महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत आयोजित करून महाराष्ट्राची बैलगाडी शर्यतीची असलेली परंपरा जोपासण्यासाठी आणि जपण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले होते व त्याला संपूर्ण राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला होता.

गेल्या काही वर्षांपासून बैलगाडी शर्यत ही कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने त्याच्यावरती बंदी आली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने अटी शर्तीसह बैलगाडी शर्यतीला मान्यता दिल्यानंतर आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत शहरात बैलगाडी शर्यतीचे आयोजन मागच्या वर्षी करण्यात आले होते. त्याच्याच दुसऱ्या पर्वाचे आयोजन 21 फेब्रुवारी 2023 रोजी कर्जत शहरातील लकी हॉटेल शेजारी असलेल्या मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी देखील उपस्थित असणार आहेत.

ग्रामीण भागात विविध प्रकारच्या शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी व कमी अंतराच्या मालवाहतुकीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडीने महत्त्वाची अशी भूमिका बजावली आहे. आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत महाराष्ट्रात बैलपोळा हा सर्जा-राजाचा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो. त्यानंतर आता राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत आयोजित करून शेतकऱ्यांसाठी प्रतिष्ठेची आणि सन्मानाची समजली जाणारी अशी ही परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना लाखोंची बक्षिसे देखील दिली जाणार आहेत.

महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी संपूर्ण राज्यभरातील बैलगाडी शर्यत प्रेमींनी कर्जत शहरातील लकी हॉटेल शेजारी असलेल्या मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here