Saturday, November 28, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडचे नेते राज्यात व्यस्त, अधिकारी बिनधास्त, जनता त्रस्त! नवीन कॉम्प्लेक्सचे गाळे धूळखात,...

जामखेडचे नेते राज्यात व्यस्त, अधिकारी बिनधास्त, जनता त्रस्त! नवीन कॉम्प्लेक्सचे गाळे धूळखात, बेरोजगारांच्या रोजगाराचे स्वप्न रखडले,

0
2
जामखेडचे नेते राज्यात व्यस्त, अधिकारी बिनधास्त, जनता त्रस्त! नवीन कॉम्प्लेक्सचे गाळे धूळखात, बेरोजगारांच्या रोजगाराचे स्वप्न रखडले,

जामखेड न्युज——

जामखेडचे नेते राज्यात व्यस्त, अधिकारी बिनधास्त, जनता त्रस्त!

नवीन कॉम्प्लेक्सचे गाळे धूळखात, बेरोजगारांच्या रोजगाराचे स्वप्न रखडले,

जामखेड शहरातील विविध भागांमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य वाढत असताना आता जामखेड बसस्थानक परिसरातील घाणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जामखेड नगरपरिषदेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील समस्यांनंतर आता जामखेड न्यूजने बसस्थानक परिसरातील अस्वच्छता, रखडलेले गाळे वितरण आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

जामखेडचे लोकप्रतिनिधी राज्यस्तरीय राजकारणात व्यस्त असताना स्थानिक प्रशासनावर कोणाचा वचक आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अधिकारी बिनधास्त आणि जनता त्रस्त, अशी परिस्थिती शहरातील विविध भागांमध्ये निर्माण झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

दहा प्लॅटफॉर्मचे बसस्थानक, पण सुविधांचा अभाव!
जामखेड बसस्थानकाचे नूतनीकरण करून दहा प्लॅटफॉर्म आणि नवीन कॉम्प्लेक्सची उभारणी करण्यात आली आहे. आधुनिक स्वरूपाचे बसस्थानक उभे राहिल्याने प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील, तसेच नवीन कॉम्प्लेक्समधील गाळ्यांमुळे स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती.

बसस्थानक परिसरात कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीने प्रवासी त्रस्त!
नवीन बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसत असून, पाच ते सहा डस्टबिनमधील कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याचे चित्र आहे. बसची वाट पाहणारे प्रवासी, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या अस्वच्छ वातावरणाचा त्रास सहन करावा लागत आहे.
बसस्थानक हे तालुक्यातील महत्त्वाचे प्रवासी केंद्र असताना येथे स्वच्छतेची नियमित व्यवस्था का नाही? कचरा वेळेवर उचलला जात नाही का? स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कोणाची? असे प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत.

एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या तिकिटावर दोन रुपये स्वच्छता अधिभार आकारला जात असल्याचे सांगितले जाते. प्रवाशांकडून स्वच्छतेच्या नावाखाली पैसे घेतले जात असताना बसस्थानक परिसरात अस्वच्छता कायम राहणे ही गंभीर बाब आहे.

स्वच्छता अधिभार नेमका कोणत्या कामासाठी वापरला जातो? बसस्थानकाची स्वच्छता कोणत्या यंत्रणेमार्फत केली जाते? कचरा उचलण्याची नियमित व्यवस्था आहे का? याबाबत एसटी प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे.

गाळे वितरणाबाबत अधिकाऱ्यांमध्येच विसंगती!
नवीन कॉम्प्लेक्समधील गाळे वितरणाच्या प्रश्नावर एसटी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी माहिती मिळत असल्याचे समोर आले आहे.विभाग नियंत्रक  यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून गाळे वितरणाबाबत विचारणा केली असता, “आमच्याकडे गाळे वितरणासंदर्भात कोणत्याही प्रकारचे पत्र आलेले नाही,” असे त्यांनी सांगितले.

मात्र, एसटी विभागातील अधिकारी दरेकर यांच्याकडे विचारणा केली असता, “आम्ही गाळे वितरणासंदर्भातील पत्र दिले आहे,” असे त्यांनी सांगितले.
त्यामुळे गाळे वितरणाचे प्रकरण नेमके कुठे अडले आहे? पत्र दिले असेल तर त्यावर पुढील कार्यवाही का झाली नाही? संबंधित कार्यालयाकडे पत्र पोहोचले नसेल तर त्याची जबाबदारी कोणाची? आणि गाळे वितरणाची निश्चित तारीख कोण जाहीर करणार? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

दहा प्लॅटफॉर्म असलेल्या बसस्थानकात पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने संध्याकाळच्या वेळी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिला प्रवाशांसाठी हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध नसल्याचेही निदर्शनास येत आहे.

बसस्थानक परिसरात पोलिस चौकी नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. संध्याकाळच्या वेळी पोलिसांची गाडी नियमित गस्त घालणे आवश्यक आहे. तसेच बसस्थानक परिसरात झाडे लावण्याचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही.

जामखेड बसस्थानक हे ग्रामीण भागातील हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे येथे स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा, महिला प्रवाशांसाठी सुविधा आणि व्यावसायिक गाळ्यांचे वितरण या बाबींना प्राधान्य देणे आवश्यक आहे.
संबंधित एसटी प्रशासनाने नवीन कॉम्प्लेक्समधील गाळ्यांचे वितरण तातडीने करावे, बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावावी, स्वच्छता अधिभाराचा योग्य विनियोग करावा आणि बसस्थानकातील सर्व मूलभूत सुविधा पूर्ण कराव्यात, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून होत आहे.

जामखेडचे नेते राज्यात व्यस्त असले, तरी स्थानिक जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये. अधिकारी वर्गावर जबाबदारी निश्चित करून बसस्थानकाचा कारभार सुधारण्याची गरज आहे. अन्यथा ‘नेते व्यस्त, अधिकारी बिनधास्त आणि जनता त्रस्त’ हेच जामखेडचे वास्तव कायम राहणार का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!