भुतवडा तलाव आटतोय, जामखेडकरांवर पाणीटंचाईचे संकट! ३० टँकरची मागणी, आता १२ दिवसांनी पाणी! जामखेडकरांनो, पाणी जपून वापरा! नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांचे आवाहन
भुतवडा तलाव आटतोय, जामखेडकरांवर पाणीटंचाईचे संकट! ३० टँकरची मागणी, आता १२ दिवसांनी पाणी!
जामखेडकरांनो, पाणी जपून वापरा! नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांचे आवाहन
जामखेड शहरातील पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असताना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील पाणीसाठ्याची नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात आणि पाणीपुरवठा सभापती श्रीराम डोके यांच्यासह नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी तलावातील उपलब्ध पाण्याची स्थिती जाणून घेतली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत असून, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी केले.
जामखेड शहराची लोकसंख्या वाढल्याने पाण्याची मागणीही वाढली आहे. त्यातच भुतवडा तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना नगरपरिषद प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे. तलावात पुरेसा पाणीसाठा असतानाही यापूर्वी आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत होता. आता उपलब्ध पाण्याचा विचार करून साधारणतः बारा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती प्रांजलताई चिंतामणी यांनी दिली.
पाच मोटारींद्वारे पाणीपुरवठा सुरू शहरातील पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी पाच मोटारींच्या माध्यमातून पाणी चारीत टाकून पुढे टाकीत सोडले जात आहे. उपलब्ध पाण्याचा अधिकाधिक उपयोग करून नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पाणीसाठा मर्यादित असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक असल्याचे नगराध्यक्षा यांनी स्पष्ट केले.
३० टँकरची मागणी; दररोज सहा लाख लिटर पाण्याचे नियोजन शहरातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन नगरपरिषदेकडून ३० टँकरची मागणी करणारा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी गेल्या महिन्यापासून नियोजन केले जात असल्याचे सांगण्यात आले. या नियोजनातून दररोज सुमारे सहा लाख लिटर पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मांदळी आणि चोंडी येथील पाण्याच्या स्रोतांचाही टँकर नियोजनासाठी विचार केला जात असल्याची माहिती देण्यात आली.टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर शहरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रस्ताव मंजूर होणे आणि प्रत्यक्ष टँकर सुरू होणे यावर या नियोजनाची अंमलबजावणी अवलंबून राहणार आहे.
पाण्याच्या प्रश्नावर राजकारण नको – श्रीराम डोके पाणीपुरवठा सभापती श्रीराम डोके यांनी भुतवडा तलावातील पाणीसाठा कमी झाल्याचे सांगितले. सध्या पाच मोटारींच्या माध्यमातून पाणी चारीत सोडून टाकीत पोहोचविण्याची व्यवस्था सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील असून, विरोधकांकडून पराभवाच्या पार्श्वभूमीवर आरोप केले जात असल्याची टीका त्यांनी केली. नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नावर राजकारण न करता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पाच वर्षांत जनहिताची कामे करणार! नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. आगामी काळात जनहिताची कामे करण्यावर भर दिला जाणार असून, पुढील महिन्यात शहरात बारा घंटा गाडी सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. भुतवडा तलावातील घटता पाणीसाठा, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी या पार्श्वभूमीवर जामखेड शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे टँकरचा प्रस्ताव किती लवकर मंजूर होतो आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठा कधी सुरू होतो, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
चौकट नागरिकांनो, पाण्याचा अपव्यय टाळा! भुतवडा तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवू नये, तसेच पाण्याचा वापर आवश्यकतेपुरताच करावा, असे आवाहन नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी केले.
पाहणीवेळी उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, अशोक शेळके, पाणीपुरवठा सभापती श्रीराम डोके, अमित चिंतामणी, नंदाताई होळकर, नगरसेवक विकी घायतडक, मनोज कुलकर्णी, प्रविण चोरडिया, सागर टकले, हर्षल काळे, प्रविण होळकर, मिसाळ साहेब आदी उपस्थित होते.