जामखेड न्युज – – – – –
जामखेडमध्ये गुंडांचा धुमाकूळ! युवकाचा हात तोडला, पोलिसांच्या डोक्यात काठी, कायदा-सुव्यवस्था वाऱ्यावर?
पोलिसांचा धाक कमी झाला की दबावाचे राजकारण? सामान्य जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

जामखेड शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील गजबजलेल्या ठिकाणी युवकावर हल्ला होऊन त्याचा हात तोडल्याची घटना असो किंवा गर्दीत संशयित आरोपीला पकडण्याच्या प्रयत्नात पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे यांच्या डोक्यात काठी मारून त्यांना रक्तबंबाळ केल्याची घटना असो, या घटनांनी शहरातील सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण केली आहे. कायद्याचा धाक नेमका कमी होत आहे का? गुन्हेगारांना पोलिसांची भीती उरली नाही का? आणि पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? असे अनेक प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

जामखेड शहरात वाढत्या हिंसक घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राहुल अंधारे यांच्यावरील हल्ल्यात युवकाचा हात तोडल्याची घटना आणि आता गर्दीत संशयिताला पकडण्याच्या प्रयत्नात पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे यांच्या डोक्यात काठी मारून त्यांना रक्तबंबाळ केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

गजबजलेल्या ठिकाणी युवकावर हल्ला होतो, गर्दीतून आरोपी पसार होतात आणि आता पोलिसांवरच हल्ले होतात; मग गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलाय तरी कुठे? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

पोलिसांवर दबाव आहे का?
पोलिसांच्या कारवाईवर कोणाचा दबाव आहे का, हा प्रश्न उपस्थित होत असला तरी त्याबाबत ठोस पुरावे समोर येणे आवश्यक आहे. मात्र, गुन्हेगार कोणाच्याही प्रभावाखाली असोत, त्यांच्यावर निष्पक्ष आणि कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.




