Wednesday, September 16, 2026
Home ताज्या बातम्या पहाटे सरकार जरांगे पाटलांच्या दारी!, ५८ लाख नोंदींवर जरांगे पुन्हा आक्रमक ...

पहाटे सरकार जरांगे पाटलांच्या दारी!, ५८ लाख नोंदींवर जरांगे पुन्हा आक्रमक “मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर येऊन शब्द द्यावा”

0
2
पहाटे सरकार जरांगे पाटलांच्या दारी!, ५८ लाख नोंदींवर जरांगे पुन्हा आक्रमक  “मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर येऊन शब्द द्यावा”

जामखेड न्युज – – – – – 

पहाटे सरकार जरांगे पाटलांच्या दारी!, ५८ लाख नोंदींवर जरांगे पुन्हा आक्रमक

“मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर येऊन शब्द द्यावा”

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची भूमिका कायम ठेवलेल्या मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळाने आज पहाटे भेट घेतली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे आणि प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी सरकारच्या वतीने जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. सरकारकडून चर्चा आणि तोडग्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असताना, जरांगे पाटील यांनी मात्र ठोस आणि लेखी आश्वासनावर भर दिला आहे.

“पुन्हा-पुन्हा तोच घोळ नको”
चर्चेदरम्यान जरांगे पाटील यांनी सरकारसमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्णय (जीआर) काढावा, अशी त्यांची भूमिका आहे. तसेच ५८ लाख नोंदींच्या बाबतीत भविष्यात कोणताही संभ्रम राहू नये, यासाठी सरकारने स्पष्टपणे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

“५८ लाख नोंदी कमी होणार नाहीत, याची लेखी हमी द्यावी. या नोंदींचे वाटप, त्यावर आधारित प्रमाणपत्रे आणि वैधतेसंदर्भातील प्रक्रिया स्पष्ट करावी. पुन्हा-पुन्हा तोच घोळ नको,” अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारने शोधलेल्या ५८ लाख नोंदी ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्याबाबत यापूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर शब्द द्यावा
केवळ चर्चेपुरते आश्वासन नको, तर सरकारने त्याची अधिकृत आणि लेखी हमी द्यावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी आणि शब्द द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

गॅझेटियरची अंमलबजावणी, ५८ लाख नोंदींचे संरक्षण, त्यांचे वाटप आणि वैधतेच्या प्रक्रियेबाबत स्पष्टता मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते.

सरकारच्या शिष्टमंडळाकडून मनधरणी
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त होत आहे. सरकारच्या वतीने त्यांना आंदोलन आणि उपोषण मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वीही जरांगे यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी आणि उपचार घ्यावेत, असे आवाहन केले होते.

दरम्यान, जरांगे पाटील आज पाटोदा येथून मुंबईच्या दिशेने पुढील प्रवास सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पहाटे झालेल्या सरकार-जरांगे भेटीनंतर पुढील निर्णयाकडे मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!