ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वुशू स्पर्धेत जामखेडच्या रोहित थोरातचा कांस्यपदकावर ठसा! जम्मू-काश्मीरमध्ये दमदार कामगिरी; यापूर्वी मॉस्को स्टार आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही पटकावले होते कांस्यपदक
ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वुशू स्पर्धेत जामखेडच्या रोहित थोरातचा कांस्यपदकावर ठसा!
जम्मू-काश्मीरमध्ये दमदार कामगिरी; यापूर्वी मॉस्को स्टार आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही पटकावले होते कांस्यपदक
जम्मू-काश्मीर येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वुशू स्पर्धेत जामखेडच्या आयडियल स्पोर्ट अकॅडमीचा खेळाडू रोहित थोरात याने दमदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. रोहितच्या या उल्लेखनीय यशामुळे जामखेडच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
रोहित थोरात याने यापूर्वी दोन वेळा ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वुशू स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र, दोन्ही वेळा त्याला पदकाने हुलकावणी दिली होती. परंतु अपयशाने खचून न जाता सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर रोहितने यंदाच्या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि अखेर कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
विशेष म्हणजे, रोहितने याच वर्षी रशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मॉस्को स्टार वुशू स्पर्धेतही कांस्यपदक पटकावून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाची छाप उमटवली आहे. त्यामुळे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणारा खेळाडू म्हणून रोहितची वाटचाल सुरू आहे. सध्या रोहित थोरात हा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, आष्टी येथे बी.पी.एड.चे शिक्षण घेत असून, शिक्षणासोबतच वुशूच्या सरावावरही तो सातत्याने लक्ष केंद्रित करत आहे.
त्याला आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा राष्ट्रीय पंच लक्ष्मण उदमले तसेच उपाध्यक्ष शाम पंडित यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रोहितच्या या यशाबद्दल विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. प्रांजल अमित चिंतामणी, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सचिन देशमुख तसेच प्राचार्य बाळासाहेब खेमगर यांनी रोहितचे अभिनंदन केले. त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा देत त्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी मोठे यश संपादन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
रोहित थोरातच्या या यशामुळे जामखेडच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित होण्याची संधी मिळाली असून, त्याच्या पुढील कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.