पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेल्या मारहाण प्रकरणात तोफखाना पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, या प्रकरणातील आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १११ची वाढीव तरतूद लागू करण्यात आली आहे.पत्रकारास मारहाण करणाऱ्या गुन्हेगार टोळीविरुद्ध कठोर कारवाई करत त्यांची दहशत मोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटमध्ये दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २० ऑगस्ट २०२६ रोजी पाईपलाईन रोड परिसरात फिर्यादीचा मुलगा सार्थक थोरात हा आपल्या कारने भिस्तवाडा चौकातून एकविरा चौकाकडे जात असताना मोपेड मोटारसायकलवरील चालकाने त्याच्या कारला पाठीमागून धडक दिली. यावरून झालेल्या वादाची माहिती सार्थकने वडील पत्रकार सुशील थोरात यांना दिली.
यानंतर सुशील थोरात हे एचडीएफसी बँकेजवळ आले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून दांड्याने डोक्यात मारल्याचा आरोप आहे. तसेच त्यांचे हातपाय धरून गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यांच्या मुलालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चार आरोपींविरुद्ध गुन्हा- तिघांना अटक या प्रकरणात सोनू उर्फ हेमंत दत्तात्रय कोहक, विकी उर्फ विकास बाळासाहेब ढवण, महेश उर्फ पप्पू दशरथ मते, प्रशांत शिवाजी निक्रड आणि अमोल रामदास साठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान सोनू उर्फ हेमंत कोहक, महेश उर्फ पप्पू मते आणि प्रशांत शिवाजी निक्रड या आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधित आरोपींविरुद्ध तोफखाना तसेच पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, फसवणूक, जबरी मारहाण आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.
‘कलम १११’ वाढीव कलम लागू आरोपींवर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गंभीर स्वरूपाचे शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध गुन्हे सातत्याने करणाऱ्या आरोपींवर परिणामकारक कारवाई करण्यासाठी भारतीय न्याय संहितेतील कलम १११ हे वाढीव कलम लावण्याचा प्रस्ताव तोफखाना पोलिसांकडून अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर या गुन्ह्यात कलम १११ लागू करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या कारवाईमुळे संबंधित गुन्हेगार टोळीची दहशत मोडून काढण्यास मदत होईल, असा पोलिसांचा दावा आहे. नागरिकांना त्रास देणाऱ्या, कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या तसेच सराईत गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य तसेच पोलीस कर्मचारी हेमंत झिने व इतर कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
दरम्यान, भविष्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या तसेच सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांकडून परिणामकारक कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची भीती बाळगू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.