जामखेड न्युज——
जामखेड बस आगार व स्थानकातील समस्यांचा पाढा विभाग नियंत्रकापुढे
ढिसाळ नियोजनामुळे दोन वर्षापासून जामखेड आगार तोट्यात
जामखेड बसस्थानक व आगारातील दुर्दशा, प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, बसस्थानकाचे मंद गतीने चालणारे काम, बंद पडणा-या बस, आगाराचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना, शालेय विद्यार्थ्यांना व प्रवाशांना वेळेत बस सोडणे, शौचालय व प्रवाशांची सुरक्षा याबाबतचा पाढा वाचला व निवेदन विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांना दिले. याबाबत महिनाभरात तुम्हाला परिणाम दिसतील तसेच जामखेड नगर ही बस माहीजळगाव, मिरजगाव मार्गे लवकरच चालू केली जाईल असे आश्वासन सपकाळ यांनी दिले.
जामखेड बसस्थानक व आगाराचा आढावा घेण्या साठी जिल्हा विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ शुक्रवारी जामखेड येथे आल्या असता त्यांची जामखेड तालुका प्रवासी संघटनेने भेट घेऊन प्रवाशांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष वसंत राळेभात, सचिव सागर गुंदेचा,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तुकाराम अंदुरे व पत्रकार उपस्थित होते. यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी आगारप्रमुखाच्या ढिसाळ कारभारामुळे बस वेळेवर सुटत नाही त्यामुळे इतर आगाराच्या बस व्यवसाय घेऊन जातात. सध्याच्या असलेल्या दहा ते बारा वर्षे जुन्या असल्याने रस्त्यावर त्या बंद पडतात जिल्ह्य़ातील इतर आगाराना नवीन बस मिळाल्या आम्ही नवीन बसची मागणी याबाबत निवेदन दिले पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही.
आगाराचे डांबरीकरण झालेले 30 वर्षे झाली सर्व आगार परिसर चिखलाने माखलेला झाला आहे, आगारातील जुने टायर,गवतावर फवारणी आदी विषय मांडले, उपाध्यक्ष वसंत राळेभात,सागर गुंदेचा तुकाराम अंदुरे यांनी बसस्थानकात महिलांना व पुरुषांना शौचालय, लघुशंकासाठी एकाच रस्त्याने जावे लागते तेथे व्यवस्थित सोय नसल्याने उघड्यावर बसतात यामुळे महिलांसाठी तातडीने व्यवस्था करावी तसेच नवीन बसस्थानकाचे काम धिम्या गतीने चालू असल्याने प्रवाशांना बसण्यास जागा नाही, जामखेड तालुका चार जिल्ह्याच्या सिमेवर असल्याने येथे दिवसरात्र बस येतात त्यामुळे प्रवासी असतात त्यामध्ये महिला असतात रात्रीच्या वेळी ग्रामीण भागात जाण्यासाठी बस नसतात त्यामुळे प्रवासी बसस्थानकात झोपतात गुंड प्रवृत्तीच्या मुलांचे टोळके असते काही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्षता घ्यावी,पोलीस चौकी साठी व्यवस्था आहे पण तेथे पोलीस नसतो त्यासाठी पोलीस अधीक्षक यांना पत्र द्यावे व आपला एक कर्मचारी कायम असावा अशी मागणी केली.
प्रवासी संघटना व पत्रकारांनी विचारलेल्या विविध मुद्दय़ांवर तासभर चर्चा झाल्यानंतर विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी नगरपरिषद, पोलीस निरीक्षक यांना पत्रे देण्यास आगारप्रमुख प्रमोद जगताप यांना दिले याबाबत पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना पत्र दिले जाईल.
आगार प्रमुखांनी यापुढे सतर्क राहून कर्तव्य बजवावे तसेच सेवाज्येष्ठता डावलून काम करू नका दोन वर्षांपासून आगार तोट्यात आहे याबाबत सुधारणा करा असा समज दिला. जामखेड वरून नगरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. जामखेड आष्टी कडा यामार्गे रस्त्याचे काम चालू असल्याने दररोज येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची दखल घेऊन लवकरच माहीजळगाव मार्गे नगरला जाण्यासाठी दोन बस सोडण्यासाठी नियोजन करण्यात येतील असे आश्वस्त केले.